पिंपरी-चिंचवड ( पुणे ) - सोने-खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन बनावट पेमेंट अॅपद्वारे सराफांना गंडा घालणाऱ्या आरोपीला ( 25 Jewellery shops owners cheating through fake payment ) पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ( Pimpari Chinchwad Anti Gunda squad ) अटक केली. या आरोपीने युट्युबवर व्हिडीओ पाहून एक अॅप्लिकेशन डाउनलोड केले होते. त्यातून तो पैसे पाठवल्याचे सराफ दुकानदारांना दाखवत होता. निखिल सुधीर जैन (वय 22, रा. उंड्री पुणे. मूळ रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Pimpari Chinchwad Police commissioner Krushn Prakash ) यांनी बनावट पेमेंट अॅपद्वारे सराफांना गंडा घालणाऱ्या स्मार्ट आरोपीची माहिती दिली. आरोपी निखिल याने काही कामधंदा नसल्याने पैसे मिळवण्यासाठी नवीन युक्ती युट्युबवर शोधली. त्याला बनावट पेमेंट अॅपबाबत माहिती मिळाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सराफी दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने जात असे. दुकानातून अर्धा तोळा ते एक तोळा सोने खरेदी करत असे. सहसा तो सोन्याचा कॉइन अथवा सोन्याची अंगठी घेत असे.
हेही वाचा-Gym Trainer Become Thief : कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने जिम ट्रेनर बनला चोर, पत्नीच्या मदतीने सोने चोरी
बनावट अॅप दाखवून सोने दुकानदारांची करत होता फसवणूक
पैसे देण्याच्या वेळी त्याच्याकडे असलेल्या बनावट अॅप्लिकेशनमधून तो पेमेंट केल्याचा बनाव करत असे. पेमेंटसाठी दुकानातील क्युआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवले असल्याचे दुकानातील कामगार व दुकानदारांना दाखवत असे. मात्र बनवत अॅप्लिकेशन मधून पेमेंट पाठवले जात नसत. सुरुवातीला सराफ दुकानदारांना याचा संशय येत नसे. कारण पेमेंट झाल्यानंतर काही वेळानेदेखील बँकेचे मेसेज येतात. त्यामुळे दुकानदार सेफ साईड म्हणून ग्राहकाचा फोन क्रमांक लिहून घेतात.
हेही वाचा-Omicron in Maharashtra : अवघ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला ओमायक्रॉनची लागण
274 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले!
चिंचवड येथील एका सराफाच्या दुकानातून आरोपीने एक सोन्याचे नाणे खरेदी केले. त्याच्या ठरलेल्या पॅटर्नप्रमाणे त्याने पैसे ट्रान्सफर केल्याचे दुकानदाराला दाखविले. मात्र ठराविक वेळेनंतर पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने ग्राहकाला फोन केला. मात्र फोन बंद लागला. त्यानंतर दुकानदाराने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे गुंडा विरोधी पथक करत होते. गुंडा विरोधी पथकाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील तब्बल 274 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याला उंड्री पुणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
हेही वाचा-Sharad Pawar Speech Book : तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कसे ठेवता? कवी किशोर कदमांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर-
5 लाख 77 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल
आरोपी निखिल याने चिंचवड येथील दुकानदारासह पिंपरी-चिंचवड शहरातील सहा, पुणे शहरातील 17 आणि पुणे ग्रामीण मधील दोन सराफ दुकानदारांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून 105 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण 5 लाख 77 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, सुनील चौधरी, विजय तेलेवार, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी यांच्या पथकाने सहभाग घेतला.