पुणे- शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोव्हिड रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर महापालिकेने रुग्ण व्यवस्थापन करण्यासाठी तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि जम्बो कोव्हिड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्ष रुबल अग्रवाल यांनी याबाबत कार्यवाही केली आहे. आता या जम्बो कोविड रुग्णालयात 50 डॉक्टर आणि 120 पॅरामेडिकल कर्मचारी असे मनुष्यबळ काम करणार आहे.
जम्बो सेंटरमध्ये रुग्णसेवेतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अचानक राजीनामे दिल्यानंतर महापालिकेने त्यांच्या विरोधात नोटीस बजावली आहे. तसेच महापालिकेच्या वतीने त्वरीत या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये तत्काळ डॉक्टर परिचारिकांची नियुक्ती करून त्यांना सेवत रुजू करून घेतले आहे. शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्बो कोव्हिड रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. तेथे दोन कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, जम्बो सेंटरमध्ये सर्व उपचार विनामूल्य केले जातील. रेमिडिसीविर इंजेक्शन्स देखील विनामूल्य दिली जातील, असे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.