पिंपरी-चिंचवड -शहरात कोरोना बरोबरच डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातून जाणाऱ्या पवना नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी फोफावली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी ठेकेदार पोसले जातात. प्रत्यक्षात मात्र पावसाची वाट पाहिली जाते, पाऊस आला की जलपर्णी वाहून जाईल, अशी अपेक्षा ठेकेदारांना असते.
आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश?
याप्रकरणी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी लक्ष घालत संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल आणि आरोग्य अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे, असे पालिका आयुक्त राजेश पाटील यांना सांगितले असल्याचे महापौर यांनी सांगितले आहे.
कोरोनाबरोबर डासांमुळे नागरिक मात्र हैराण!
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक कोरोनाबरोबर डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत. एकीकडे कोरोना महामारीची भीती तर रात्री डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे महानगरपालिकेत जलपर्णी काढण्यासबंधी भर दिला जात आहे. प्रत्येक्षात मात्र ठेकेदाराकडून पावसाची वाट पाहिली जात असून काही ठिकाणी जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पवना नदीत जलपर्णी फोफावते.
जलपर्णीमुळे वाढला डासांचा प्रादुर्भाव
नदीत घाणीचे साम्राज्य होऊन डासांची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत पावणे सहाशे टन जलपर्णी काढली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली आहे. रावेत, केजुबाई धरण, जाधव घाट, वाल्हेकरवाडी, सांगावी, दापोडी, या ठिकाणी जलपर्णी काढण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, जलपर्णीसंबंधी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, असे आयुक्त राजेश पाटील यांना सांगण्यात आले असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले आहे.