पुणे - लाचलुचपत प्रकरणात अटक करण्यात आलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयात अचानक छापा टाकला. लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद काळे यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
या सर्वांना आज (गुरुवारी) पुणे न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर न्यायालयात आले भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडमधील आमदार महेश लांडगे यांनी याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले नितीन लांडगे आणि परिवाराचा मागील इतिहास पाहिला असता या परिवाराने आजवर राजकारण न करता समाजकारण केले आहे. त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी कोणीतरी हे षड्यंत्र केले आहे. कुठलाही पुरावा नसताना, रेकॉर्डिंग नसताना नितीन लांडगे यांनी स्वतः पैशाची मागणी केली नसताना त्यांना अडकवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल, असे दिसत असल्यामुळेच विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा अशाप्रकारे कट सुरू आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्याय देवता योग्य तो न्याय करेल, अशी प्रतिक्रिया महेश लांडगे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समितिच्या कार्यलयात अचानक एसीबीने धाड टाकत काही जणांची चौकशी केल्याचे समोर आले होते. अद्याप ही कारवाई कोणावर करण्यात आली हे कळू शकले नव्हते. परंतु यामुळे महानगरपालिकेसह पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, महानगरपालिकेतील धाड सत्र सुरू राहिल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याअगोदर देखील अनेक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे महानगर पालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह पाचजण एसीबीच्या जाळ्यात