पुणे -मुंबईमध्ये 26/11 च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी जवान व कर्मचाऱ्यांना पुणेकर नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 26/11 च्या पूर्वसंध्येला पोलीस मित्र संघटनेच्या वतीने झाशीच्या राणी पुतळ्याजवळ पोलीस अधिकारी, सर्व सामान्य नागरिकांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी कर्मचारी कमांडो होमगार्ड व नागरिक अशा 178 जणांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगमध्ये नागरिकांनी शहिदांना आदरांजली अर्पण केली.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ले केले होते. दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागच्या गल्लीत देखील हा हल्ला घडवण्यात आला होता. याबरोबरच विलेपार्ले परिसरात एका टॅक्सीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
26 नोव्हेंबरच्या दिवशी रात्री आठ वाजता मुंबईत दाखल झालेले 10 दहशतवादी हे वेगवेगळ्या गटात विखुरले होते. यात दोघांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा व खाण्यापिण्याचे सामान होते. मुंबईतील ताज हॉटेल, ट्रायडंट हॉटेल, नरीमन हाऊस, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, विलेपार्ले अशा ठिकाणी गेलेल्या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जीवाची बाजी लावली होती. यामध्ये मुंबई पोलिसांच्या 18 जवानांना वीरमरण आले होते. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी 400 लष्कर कमांडो, 300 एनएसजी कमांडो तसेच 100 मार्कोस कमांडो हे घटनास्थळी पाठवण्यात आले होते.