पुणे -डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांना श्रद्धांजली वाहून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाच्या खटल्याची केस लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दाभोळकरांना जरी मारले असले तरी त्यांच्या विचारांना कोणीही मारू शकत नाही. डॉक्टरांचे काम अविरत चालू ठेवू अशी घोषणा देत, 'मीसुद्धा दाभोळकर' असे म्हणत शहराच्या मध्यवर्ती भागातून आज (शुक्रवार) रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळून नागरिकांनी सहभाग घेतला होता.
'खुनाचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट'
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्टला गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आठ वर्ष पूर्ण झालीत. या आठ वर्षांमध्ये संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केलेली आहे, तसेच कलबुर्गी पानसरे आणि गौरी लंकेश यांच्याही संशयित मारेकऱ्यांना देखील पकडण्यात सीबीआयला यश आले आहे. जरी या सर्व संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने पकडले असले, तरी या घटनेचा मुख्य सूत्रधार अजून मोकाट आहे. आणि न्यायालयात अजून ही ट्रायल केस उभी राहिलेली नाही. तसेच या खूनामागे जे मुख्य सूत्रधार होते त्यांनाही अजून पकडण्यात यश आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर या सूत्रधारांना पकडण्यात यावे आणि लवकरात लवकर या खूनाची केस कोर्टामध्ये उभी राहावी अशी मागणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा मुलगा हमीद दाभोळकर यांनी यावेळी केली.