Exam Fever 2022 : पुणे - राज्यात सध्या पेपर फुटी प्रकरण ( Paper Leak Case ) आणि नोकर भरती घोटाळा हा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. राज्यात सरळ सेवा भरतीचे जवळपास २ ते ३ लाख पदे रिक्त ( Direct Service Recruitment Vacancy ) असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. यावरूनच विद्यार्थी आणि समन्वय समिती आता अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
मागील तीन वर्षांपासून भरती रखडली -मागील तीन वर्षांत शासनाच्या सरळ सेवा भरतीतून केवळ ‘गट क' आणि ‘गट ड' मधील केवळ ८,५४७ जणांनाच नोकरी मिळाली आहे. राज्यात बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झाली आहे. तर दुसरीकडे, भरती प्रक्रियांमध्ये झालेले घाेटाळे आणि त्यामुळे काही पदांसाठी शासनाने केवळ अर्ज भरून घेतले, मात्र नंतर परीक्षाच घेतली नाही. त्यामुळे जे उमेदवार शासनाच्या सेवेत तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून दाखल होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे डोळे अजूनही या भरती प्रक्रियेकडे लागले आहेत. एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मुद्दा समोर आणला आहे. त्यांच्या म्हणन्यानुसार जवळपास अडीच ते तीन लाख पदे सध्या रिक्त आहेत. आणि त्यातच आता गेल्या तीन वर्षापासून नवीन कुठली भरती झालीच नाही. राज्यात जवळपास ५ ते ६ विभागाच्या पदांची भरती बाकी आहेत. याचच एक उदाहरण म्हणजे टिईटी आणि आरोग्य खात्यात झालेले घोटाळे. नुकत्याच झालेल्या परीक्षा घोटाळ्यात शिक्षकांच्या जवळपास ६ हजार पदांसाठीचा परीक्षेत टीईटी घोटाळा समोर आला आणि ही भरती न्यायालयीन प्रक्रियेत अडकली. अशी १३ हजार पदे परीक्षा होऊनही घोटाळ्यात अडकली आहे आणि अशा कारणांनी ही पदभरती रखडली आहे.
टीईटी, एमआयडीसी, आरोग्य खात्याचे पेपर फुटले ४ वेळा -पद न भरण्यास पेपर फुटी हाच कळीचा मुद्दा बनला आहे. याची सुरुवातही २०१९ मध्ये झाली होती. यावर्षी सुरुवातीला सरकारकडून एमआयडीसीच्या ५०२ पदांसाठी अर्ज मागवले. या पदभरतीचे काम ब्लॅकलिस्टेड कंपनीला दिल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले आणि परीक्षा रखडल्या गेल्या. नंतर २०२१ मध्ये सगळ्यात मोठे आणि मुख्य पेपर फुटीचे प्रकरण समोर आले ते म्हणजे आरोग्य विभागाचे पेपर फुटी प्रकरण. आरोग्य विभागाच्या ६ हजार १९१ पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत थेट मंत्रालयातून पेपर फुटला. त्यामुळे ही देखील भरती होऊ शकलेली नाही. म्हाडाच देखील असेच झाले. ५६५ पदांसाठीच्या भरतीत डमी उमेदवार परीक्षेला बसवणारे रॅकेट समोर आले होते. अर्ज मागवले, पण परीक्षा मात्र घेतली नाही. त्याचबरोबर आतापर्यंत जलसंपदा विभागाची परीक्षा ही तीन वेळेस रद्द करण्यात आलेली आहे.