महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Padmashri Dr Ganesha Devi : आपला इतिहास आणि आपले ज्ञानविश्व समजून घेण्यासाठी पाली शिकणे आवश्यक : पद्मश्री डॉ. गणेश देवी - Padmashri Dr Ganesha Devi

पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे १७ सप्टेंबर रोजी पंधरावा पाली दिन विद्यापीठाच्या ( Pune University Celebrated 15th Pali Day ) संत नामदेव सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मश्री डाॅ. गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, जर या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर पालीला स्पर्श केल्याशिवाय तो समजेलच कसा, असा प्रश्न उपस्थित केला. भारताच्या भाषिक ताण्याबाण्यांचा इतिहास समजण्यासाठी पाली आणि सर्व प्राकृत भाषा अतिशय महत्त्वाच्या आहेत. समानतेच्या परंपरेची बीजे पाली साहित्यात आहेत, असे गौरवोद्गार डॉ. देवी यांनी काढले.

Padmashri Dr. Ganesha Devi
पद्मश्री डॉ. गणेश देवी

By

Published : Sep 19, 2022, 12:24 PM IST

Updated : Sep 19, 2022, 1:02 PM IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे १७ सप्टेंबर ( Pune University Celebrated 15th Pali Day ) रोजी पंधरावा पाली दिन विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. भारतात पाली व बौद्ध अध्ययनाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या अनागारिक धर्मपाल या सिंहली विद्वानांचा हा १५८ वा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे पाली दिन साजरा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली दिन उत्साहात साजरा :विभागातील विद्यार्थ्यांनी पाली सुत्तपठन, पाली भाषेतून संवाद, कथा-अभिवाचन, भीमगीत, अनागारिक धर्मपाल, भिक्षू जगदीश कश्यप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि उर्ग्येन संघरक्षित यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी भाषणे, एकपात्री प्रयोग, कवितावाचन, पाली बडबडगीत, पाली साहित्याचा आढावा, सांगणिकपाली, आणि बौद्ध धर्माचे सामाजिक उपयोजन या विषयांवरील सादरीकरण इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने सादर केले. पाली दिनाचे औचित्य साधून वैशाली सोनावणे व लक्ष्मीकांता माने या विद्यार्थिनींनी तसेच तृप्तीराणी तायडे व दीपक शाक्य या प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाली आणि इंग्रजी भाषेत केले.

पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे पाली दिन साजरा

सगळ्या भाषांना सोबत घेऊन पाली भाषा दिन ;पाली दिन फक्त पाली भाषेचा गौरवदिन नसून, बौद्ध धर्माशी संबंधित बौद्ध संकर संस्कृत, अपभ्रंश, गांधारी आणि सैंधवी प्राकृत अशा विस्मरणात गेलेल्या सर्व भाषांचा व बहुभाषिक बौद्ध संस्कृतीचा तो गौरवदिन आहे. या सगळ्या भाषांना सोबत घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत, अशा शब्दात या दिवसाचे औचित्य विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी विशद केले.

भगवान बुद्धांचे ज्ञान ज्या भाषेत आहे ती पाली भाषा :भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधगयेचा महाविहार स्वतंत्र करण्यासाठी अनागारिक धर्मपालांनी जे प्रयत्न केले ते पूर्णत्वाला नेण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी अशी अपेक्षा कार्यक्रमाचे विशेष अतिथी व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी या वेळी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाली भवन व संशोधन केंद्राच्या इमारतीसाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त झालेला आहे. तिचे भूमिपूजन लवकरच होईल. संपूर्ण पाली तिपिटकाचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्पही लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) विद्यापीठात कार्यान्वित होईल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली.

पद्मश्री डाॅ. गणेश देवी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी :पद्मश्री डाॅ. गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, जर या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर पालीला स्पर्श केल्याशिवाय तो समजेलच कसा, असा प्रश्न उपस्थित केला. भारताच्या भाषिक ताण्याबाण्यांचा इतिहास समजण्यासाठी पाली आणि सर्व प्राकृत भाषा अतिशय महत्त्वाच्या आहेत. समानतेच्या परंपरेची बीजे पाली साहित्यात आहेत, असे गौरवोद्गार डॉ. देवी यांनी काढले. आपला इतिहास, आपला समाज आणि आपले ज्ञानविश्व समजून घेण्यासाठी पाली शिकणे आवश्यक आहे. वर्तमानकाळाच्या बरोबर राहून भूतकाळाचा अभिमान बाळगणारा देश आपल्याला जर बनायचे असेल तर पाली ज्ञानविश्व आपल्या देशासमोर घेऊन जाणे हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे, असे मत त्यांनी या प्रसंगी मांडले.

विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांचा गौरव :मागील दोन वर्षांत विभागातील निरनिराळ्या परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात प्रशस्तिपत्र, पदक आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरवर्षी पिंपरी येथील बुद्धघोष चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने हे पुरस्कार देण्यात येतात. पाली साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठीची पहिली पायरी म्हणून पाली दिनाचे औचित्य साधून या वेळी पाली धम्मपद पाठांतर स्पर्धा जाहीर करण्यात आली.

Last Updated : Sep 19, 2022, 1:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details