पुणे -कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. अशावेळी या रुग्णांना पुन्हा ऑक्सिजन देण्याची गरज भासत आहे. या एका कारणासाठी संबंधित रुग्णाला पुन्हा रूग्णालयात दाखल करावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' लायब्ररी हा उपक्रम सुरू केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्याघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे.
या लायब्ररीमधून आवश्यक त्या रुग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी किंवा रुग्णालयामध्ये पाच किंवा दहा लीटरचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यास देण्यात येणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यासाठीच्या अटी
- नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन
- रुग्णाचा कोड पॉझिटिव्ह रिपोर्ट किंवा संशयित कोविड
- डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करण्यास सांगितला याची माहिती
- रुग्णाचे हमीपत्र
- रुग्णाचा संपूर्ण निवासी पत्ता व त्याचा पुरावा, इलेक्ट्रिक बिल व आधार कार्ड