राजगुरुनगर (पुणे) : कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी अगदी मेटाकुटीला आला होता. बळीराजाला या संकटात उभारी देण्यासाठी आता नाफेडकडून चाकण बाजारसमितीमध्ये कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरच ही कांदा खरेदी आजपासुन (बुधवार) सुरू करण्यात आली आहे. यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार असल्याचे मत आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
चाकणमध्ये नाफेडच्या माध्यामातून कांद्याची खरेदी सुरु दुष्काळ, अवकाळी पाऊस, लॉकडाऊन आणि चक्रीवादळाच्या संकटात कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. त्यावर उपाय म्हणून आजपासुन चाकण बाजारसमितीत नाफेडच्या माध्यामातून कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी याचा उद्घाटन सभारंभ पार पडला. यावेळी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजारसमिती सभापती विनायक घुमटकर आणि शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा...कापूसखरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू - उपमुख्यमंत्री
चाकण बाजारसमितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते. मात्र, बाजारसमिती बंद, व्यापारी कांदा खरेदीसाठी येत नाहीत, कांदा निर्यात बंद, यामुळे शेतकऱ्यांचा लाखमोलाचा कांदा पडुन राहिला आहे. आता हाच कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी झाल्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. त्यामुळे नाफेडमार्फत होणारी ही खरेदी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.
नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याची चार ते सहा महिने साठवणूक केली जाणार आहे. यासाठी चाकण बाजारसमितीने पुढाकार घेतला असुन कांद्याची खरेदी शेतकऱ्यांच्या बांधावर केली जाणार असल्याने शेतकऱ्यांचा वाहतुक खर्च वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडचा चांगला फायदा होणार असल्याचा विश्वास नाफेडचे प्रतिनिधी तुषार थोरात यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून कांद्याची कवडीमोल बाजारभावाने विक्री होत असल्याने शेतकरी अगदी तोट्यात चालला होता. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या पुढाकारातुन अतिरिक्त कांद्याच्या खरेदीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन चाकणमध्ये कांद्याची खरेदी होणार आहे.