पुणे - पावसामुळे राज्यातील नवीन कांद्याचे नुकसान झाले असून, जुन्या कांद्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यातच परराज्यांतून मागणी वाढल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात नवीन कांद्याला किलोस 30 ते 55 रुपये, तर जुन्या कांद्याला 50 ते 80 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात दर्जानुसार 80 ते 100 रुपये किलो या भावाने कांद्याची विक्री होत आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज पुणे मार्केटयार्डातील तरकरी विभागाचे प्रमुख हनुमंत कळमकर यांनी वर्तवला. पुणे मार्केटयार्डमध्ये मंगळवारी सुमारे 50 ते 60 ट्रक जुना, तर केवळ 300 गोणी नवीन कांद्याची आवक झाली. सध्या नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे सुमारे 50 ते 60 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन कांदा चांगल्या प्रमाणात बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे.