पुणे- भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील विद्युत रोहित्राचा भीषण स्फोट झाला. या घटनेत गंभीर भाजल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीत पाच महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. स्फोटांमध्ये शारदा दिलीप कोतवाल (वय- 51) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, हर्षदा सचिन काकडे (वय- 32) आणि शिवानी सचिन काकडे (वय- 5महिने) या दोघी गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भोसरीमध्ये रोहित्राचा भीषण स्फोट; महिलेचा मृत्यू, तर मायलेकी गंभीर जखमी - भोसरीमध्ये रोहित्राचा स्फोट
भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील विद्युत रोहित्राचा भीषण स्फोट झाला. या घटनेत गंभीर भाजल्याने एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शारदा कोतवाल या त्यांची नात शिवानीला अंघोळ घालत होत्या. तर त्यांची मुलगी हर्षदा शेजारी बसल्या होत्या, नेमका याच वेळेस अपघात होऊन विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की आगीच्या ज्वाळा तीस फुटांपर्यंत पसरल्या होत्या.
या स्फोटात रोहित्रातील तेल शारदा कोतवाल, नात शिवानी आणि हर्षदा यांच्या अंगावर पडले यात शारदा या गंभीर भाजल्या. तर पाच महिन्याची चिमुकली आणि तिच्या आई जखमी झाल्या. त्यानंतर तत्काळ त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शारदा यांचा मृत्यू झाला. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्फोटामुळे रोहित्राला लागलेली आग विझवली, अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.