पुणे : महाराष्ट्रात भाजपला आता कुठलीही कुबडी नको. भाजप आता स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'आता कुठलीही कुबडी नको, महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणू' आता स्वबळावर सत्ता
देशात गेल्यावेळी भाजपे 303 खासदार निवडून आले होते. पुढच्या वेळेस 400 खासदार निवडून येतील. अनेक राज्यांत स्वतःच्या ताकदीवर भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. फक्त महाराष्ट्रात आम्हाला अडचण होती. ती सुद्धा येत्या निवडणुकीत संपवणार असे पाटील म्हणाले. भारतीय जनता पक्ष इथून पुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल. आता कुठलीही कुबडी नको. भारतीय जनता पक्ष आता स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणेल, असे पाटील यावेळी म्हणाले.
राजीनाम्याची लाईन लागेल
महाविकास आघाडी सरकारचे काळे कारनामे पाहता ते स्वतःच्या कर्मानेच मरणार असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारच्या मंत्रिमंडळात सहा जण असे आहेत, ज्यांच्या नावापुढे कुठल्या न कुठल्या गुन्ह्याची नोंद आहे. अजूनही काही मंत्र्यांची यादी यायची आहे. त्यामुळे तिसरा राजीनामा घेण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. परंतु सरकारचे कारनामे पाहता तिसरा राजीनामाही लवकरच होईल आणि त्यानंतर राजीनाम्याची लाईन लागेल असेही पाटील म्हणाले.
लॉकडाऊनविरोधात लोक रस्त्यावर उतरतील
समाजातील ज्या घटकांना लॉकडाऊनमुळे आर्थिक झळ बसणार आहे, त्यांची आधी व्यवस्था करा आणि नंतर लॉकडाऊन करा अशी मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहोत. परंतु याचा काहीही विचार न करता सरकारने मिनी लॉकडाऊन, सेमी लॉकडाऊन करत करत पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. यामुळे नाभिक समाज, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या ताई भुकेने मरतील. त्यामुळे कोरोनाने मरण्यापेक्षा भूकेने मरु म्हणून लोक रस्त्यावर उतरतील असेही ते म्हणाले.
हेही वाचा -100 कोटी वसुली प्रकरण, सीबीआयचे पथक येणार मुंबईत