पुणे - राज्य परिवहन महामंडळाकडून ५०० गाड्या या खासगी तत्वावर चालवण्याचा निर्णय महामंडळाकडून घेतला जात आहे. या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने जोरदार विरोध केला आहे. महामंडळ एसटीमध्ये खासगीकरणाचा घाट घालत आहे. यामुळे एसटी कामगारांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आर्थिक उत्पन्नही घटणार आहे. त्यामुळे महामंडळाने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने केली आहे.
'अन्यथा तीव्र आंदोलन करू'
खासगी मालक मनमानीनुसार महामंडळाच्या गाड्या चालवतील हा निर्णय आम्ही होऊ देणार नाही. एसटी महामंडळात जर खासगीकरणाचा घाट घातला तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. संघटनेच्यावतीने परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थाकीय संचालकांना पत्र लिहून निर्णय न घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.