मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळाने ३५ दिवसानंतर केली कोरोनावर मात - पुणे भारती रुग्णालयात बाळावर उपचार
मुदतपूर्व जन्मलेल्या लहान बाळाची ही एक अनोखी घटना आहे. ज्याला गंभीर कोविड -२ या आजाराने ग्रासले होते आणि जवळजवळ तीन आठवड्यांच्या व्हेंटिलेटर सपोर्ट आणि स्टिरॉइड्सच्या उच्च डोसने (काही प्रमाणात नुकसान झाले तरी) बाळ वाचू शकले.

पुणे - मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाने ३५ दिवस संघर्ष करत कोरोनावर मात केली. पुण्यातील भारती रुग्णालयात या बाळावर उपचार सुरू होते. एका खासगी रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाला कोरोनाची बाधा झाली होती. पुढील उपचारासाठी त्याला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जन्माच्या वेळी त्याचे वजन फक्त १.८ किलो होते आणि जन्मत:च त्यास श्वास घेण्यास त्रास होत होता व ऑक्सिजन देण्याची गरज होती.
भारती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले. पुढील दोन दिवसात हळूहळू श्वासोच्छवासाची अडचण वाढत गेली व बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाच्या विशेष औषधाचे दोन डोसही देण्यात आले. हे सर्व होऊनही, बाळाला १०० टक्के ऑक्सिजन आवश्यक होते आणि त्याला हाय फ्रिक्वेंसी व्हेंटिलेटर या विशेष प्रकारच्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक विशेष वायू देखील वापरला गेला. एक विशेष थेरपी (इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन) देखील दिली गेली, जे रोगप्रतिकारक शक्तीस मदत करते.
एक्स रेमध्ये दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. प्रौढांमधे कोविडची जी गंभीर लक्षणे दिसून येतात त्यासारखेच हे होते. बाळाच्या रक्ताच्या सर्व तपासण्या ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असल्याचे सूचित करत होत्या. बाळ आणि आई दोघांमध्येही कोविड अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली, म्हणजे आईलाही कोविड होऊन गेला होता. पंरतु, आईला कोविडची कोणतीही लक्षणे नव्हती.
रोगाच्या तीव्रतेमुळे आणि पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला ५ दिवस उच्च डोस स्टिरॉइड्स (मेथिलप्रेडनिसोलोन) दिले गेले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.
बाळ २२ दिवस व्हेंटिलेटरवर राहिले. त्यापैकी हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटर १६ दिवसांच्या कालावधीसाठी होते, ही एक अपवादात्मक घटना आहे. अखेरीस २५ व्या दिवशी बाळास व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. या टप्प्यावर, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात काही फायब्रोसिस दिसून आले, अशा प्रकारचे फायब्रोसिस गंभीर कोविडमधून बऱ्या झालेल्या काही प्रौढ रुग्णामध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर, ३५ व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले.
मुदतपूर्व जन्मलेल्या लहान बाळाची ही एक अनोखी घटना आहे, ज्याला गंभीर कोविड या आजाराने ग्रासले होते आणि जवळजवळ तीन आठवड्यांच्या व्हेंटिलेटर सपोर्ट आणि स्टिरॉइड्सच्या उच्च डोसने (काही प्रमाणात नुकसान झाले तरी) बाळ वाचू शकले.