महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचा महारोजगार मेळावा; ८० हजार नोकऱ्यांचे लक्ष्य - नवाब मलिक बातम्या

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यव्यापी ऑनलाइन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक पत्रकार परिषद
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचा महारोजगार मेळावा; ८० हजार नोकऱ्यांचे लक्ष्य

By

Published : Dec 8, 2020, 3:31 PM IST

मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यव्यापी ऑनलाइन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

या माध्यमातून राज्यात ८० हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठरवल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले होते. यामुळे अनेक लोकांच्या नोकर्‍याही गेल्या. रोजगारासाठी लोक अडचणीत असतानाच राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले आहे,असे ते म्हणाले. राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मलिक म्हटले.

नोंदणी आवश्यक

आजपासून 'महास्वयंम' पोर्टलवर कार्यकर्त्यांनी नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नोंदणी १२ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. १२ डिसेंबरला जे लोक नोंदणी करतील किंवा नोंदणी झालेले आहेत, त्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे. ज्या रोजगार देणार्‍या कंपन्या आहेत त्यांची नोंदणी सुरू झाली आहे. आज सकाळपर्यंत २१४ कंपन्यांनी माणसांची गरज असल्याने नोंदणी केली आहे. ४० हजार संधी आता पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये शहरी भागात २३ हजार रोजगार, ग्रामीण भागात जवळपास ९२ कंपन्यांनी १७ हजार नोकर्‍या उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये बँकींग, फायनान्स, इंशुरन्स इंडस्ट्री, सिक्युरिटी गार्ड, सेल्स मार्केटींग, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाइल, ऑटोमोबाइल अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

१२ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर सव्वा लाख रोजगार उपलब्ध होतील. या सर्वांची छाननी होऊन मेसेजद्वारे मुलाखतीला बोलावले जाईल, किंवा ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातील, असे मलिक म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ८० हजार तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पक्षाने एक वेबपोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून rojgar.mahaswayam.gov.in, yodhaat80.org ही संकेतस्थळं उपलब्ध करण्यात आली आहेत. या पोर्टलवर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन होणार आहे. शिवाय यावर माहिती भरून लोक रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

मुंबई, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन सरकारी अधिकार्‍यांना सहकार्य करणार आहेत. ८० हजार रोजगार देण्याचे काम कौशल्य विकास व उद्योजकता विभाग करेल व पक्ष त्यांना सहकार्य करणार आहे, असे अल्पसंख्यांक मंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात बेरोजगारी दूर करण्यासाठी एक मोठा उपक्रम या राज्यात राष्ट्रवादीने घेतला असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणार असल्याचा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details