पुणे - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कंगनावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे. देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ सालामध्ये मिळाले आहे. या कंगनाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झाशीच्या राणी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. कंगना रणौतला देण्यात आलेला पद्मश्री पूरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
पद्मश्री रद्द करा
कंकनाने स्वातंत्र्य योध्यांचा अत्यंत बेजाबदारपणे अपमान केला आहे. या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यांना भारताचा हा इतिहास पुसायचा आहे. त्यांना एक मनुवादीवृत्ती भारतात आणायची आहे. भाजप कंगना रणौतला पुढे करून ते हे काम करत आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार काढून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी केली आहे.