पुणे -राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी न्यायालयात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर, दहा जणांनी न्यायालयात जावे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिली. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्विट केले होते. त्यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांनी मराठ आरक्षणावरील स्थगिती उठावी, हीच सरकारची आणि राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या ट्विटवर ही दिली प्रतिक्रिया
पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटसंदर्भात अजित पवार यांनी देखील आज मौन सोडले आहे. पुणे स्टेशनवर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुलगा काय ट्विट करतो, हे मी पाहत नसतो, मला तेवढेच उद्योग नाहीत. राज्याच्या विविध जबाबदाऱ्या मला बघायच्या असतात, असे सांगून त्यांनी या प्रश्नाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार म्हणाले, की पार्थला ट्विट करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. प्रत्येकाने काय ट्विट करावे, हा त्याचा अधिकार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाविषयी आधीच भूमिका जाहीर केल्याची आठवण त्यांनी करून दिली.