पुणे - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत भाष्य करताना जीभ घसरली आहे. 'कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंकाप करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही, मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची,' अशा शब्दांत त्यांनी टिपण्णी केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली ( Rupali Thombare Patil Warn Chandrakant Patil ) आहे.
'दादा ही कोणती भाषा' -रुपाली ठोंबरे-पाटील यांनी म्हटले की, चंद्रकांत दादांच्या जे पोटात होते ते ओठावर आलेले आहे. मुळात ज्यांना महिलांचा सन्मान नाही, संस्कृती नाही, महिलांवर बद्दल आदर आणि सन्मानाची वागणूक दरवेळी त्यांच्या कृत्यातून दिसून आली आहे. आज ते खासदार असणाऱ्या महिलेला ओबीसी आरक्षणासाठी म्हणतात स्वयंपाक घरात जा, स्वयंपाक करा, मसनात जा दादा ही कोणती भाषा आहे, असा सवाल रुपाली पाटील यांनी विचारला आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील प्रतिक्रिया देताना 'मोदीकडे जाऊन तुमचा जीव गहाण ठेवला?' - तुम्ही का नाही केंद्राकडे जाऊन मोदीकडे जाऊन तुमचा जीव गहाण ठेवला?, तिथं जाऊन तुम्ही तुमचा जीव का नाही सोडला?, असा जोरदार घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे. महिला ही नवदुर्गा असते, स्वयंपाक घरात ती अन्नपूर्णा असते, मसनात गेली तर महाकाली असते. त्यामुळे ही महाकाली तुमच्या सारख्या घाणेरड्या विचारांचे मुंडन छाटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
'माफी मागा अन्यथा...' - समस्त महिला वर्गाची आणि सुप्रियताईंची माफी चंद्रकांत पाटील यांनी मागावी, अन्यथा तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. जिजाऊंच्या, रमाईच्या, सावित्रीच्या लेकीचा अपमान करणे एवढे सोप्प नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागा अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. मग याला तुम्ही आता धमकी समजा किंवा तुमच्या सारख्या वयस्कर आमदाराला अक्कल येण्यासाठी असल्याची सूचना समजा, असे सुद्धा पाटील यांनी म्हटले आहे.
'भाजपच्या नेत्यांना देशात मनुस्मृति लागू करायची' - चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंबाबात केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपची विचारधारा आहे, त्याच अनुषंगाने चंद्रकांत पाटील वागत आहेत. भाजपच्या नेत्यांना देशात मनुस्मृती लागू करायची आहे, म्हणून चंद्रकांत पाटील, अशी वक्तव्य करत आहेत. महिलांना घरी स्वयंपाक करायचा आहे का? ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं, याचा अधिकार संविधानाने महिलांना दिला आहे. मात्र, भाजपला संविधान बदलायचे आहे, असा गंभीर आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
सदानंद सुळेंनी व्यक्त केला संताप - चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सदानंद सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'चंद्रकांत पाटील हे स्त्री द्वेषी असून, नेहमीच स्त्रीचा अपमान करतात. सुप्रिया सुळे या गृहिणी आहेत, आई आहेत आणि यशस्वी राजकारणी ही आहेत. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे,' अशी पोस्ट सदानंद सुळेंनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून केली आहे. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? - मध्यप्रदेशच्या सरकारने दोन दिवसांमध्ये दिल्लीत असं काय केले ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला विचारला होता. त्यावर, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचं, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर केली होती.
हेही वाचा -Chandrakant Patil : आपले वक्तव्य सहज होते, सुप्रिया सुळेंचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; चंद्रकांत पाटलांचे घुमजाव