महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईडी, सीबीआयला भाजपाने चिल्लर करून ठेवले - नाना पटोले - नाना पटोलेंची टीका

ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ते शुद्ध आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश नाही केला त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू आहे. भाजपाने ईडी आणि सीबीआयला चिल्लर करून ठेवले, अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Jul 9, 2021, 5:22 PM IST

पुणे -ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला ते शुद्ध आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश नाही केला त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू आहे. भाजपाने ईडी आणि सीबीआयला चिल्लर करून ठेवले, अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे देश बरबाद होतोय'

नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे देश बरबाद होतोय. देशाची संपत्ती विकली जात आहे. नवीन कृषी धोरण आणून शेतकऱ्यांना देखील बरबाद करण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटी धोरणाचा राहुल गांधींनी प्रखर विरोध केला होता. तेव्हा केंद्र सरकारमधल्या लोकांनी राहुल गांधी यांची थट्टा उडवली होती. तेव्हाच जर राहुल गांधी यांना गांभीर्याने घेतले असते, तर ही परिस्थिती आली नसती. राज्यात सुरु असलेल्या महागाईविरोधात आणि पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात राज्यातील वेगवेगळ्या शहरात काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नितीन गडकरींना अडचणीत आणण्यासाठीच सहकार मंत्रालयाची स्थापना केली का?
केंद्र सरकारने नव्याने सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. अमित शहा यांच्यावर या खात्याची जबाबदारी सोपवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून नितीन गडकरींनी विकत घेतलेल्या साखर कारखान्यांच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. नितीन गडकरींना अडचणीत आणण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन केले का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्यांना सहकारातील एबीसीडी माहित नाही त्यांनी सहकारात लक्ष घातले आहे. सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना सगळे विकून टाकायचे का? सहकार उद्ध्वस्त करायचाय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद नाही'
ओबीसी नेते नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात त्यांच्यात असलेल्या वादावरून प्रश्न विचारला असता पटोले म्हणाले, वेगवेगळ्या कामासाठी नेत्यांना दिल्लीमध्ये जावे लागते. वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका असतात याचा अर्थ त्यांच्यामध्ये वाद आहे असा होत नाही.

'केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध कायम'
केंद्र सरकारने नव्याने केलेले कृषी कायदे आणि शेतकरी हिताचे नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायद्यांना काँग्रेसचा विरोध आहे. आम्ही शेतकरी हिताचा कायदा राज्यात करू, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा -खडसे यांची ईडी कारवाई राजकीय आकसापोटी - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details