पुणे - अमोल कोल्हे हे एक नट आहेत आणि त्यांनी कोणती भूमिका करावी हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र, महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हा इतिहास आहे. भूतकाळ जर मानगुटीवर बसत असेल, तर त्याबद्दल विचार न केलेलाच बरा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त ( Nana Patekar On Amol Kolhe ) केले. लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुण्यात बोलत ( Nana Patekar In Pune )होते.
नाना पाटेकर म्हणाले की, "आपल्याला भारतरत्न हे जयंती पुण्यतिथीलाच आठवतात. आपण केवळ त्यांचे चबुतरे उभे केले आहेत. पण, त्या चबुतऱ्यांखाली गाडलेले त्यांचे विचार पुन्हा बाहेर काढले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न धोंडे केशव कर्वे यांनी केलेले काम नतमस्तक होण्यासारखंच आहे. असे समाजकार्य करण्यासाठी भूकच असावी लागते."
ज्या व्यक्तीरेखा मला आवडल्या नाहीत त्या मी केल्या नाही
"ज्या व्यक्तीरेखा मला आवडल्या नाहीत त्या मी केल्या नाहीत, त्या केल्या असत्या तर झोप लागली नसती. तळमळत राहिलो असतो. खलनायकाच्या भूमिका करताना त्या संपूर्ण व्यक्तीरेखातून जावे लागते, त्याचा त्रास होतो. माफीचा साक्षीदार चित्रपटातील जक्कल साकारताना मलाही त्रास झाला. ही भूमिका केल्याचा आनंद मला कधीच वाटला नाही," असेही नाना यांनी बोलताना सांगितले.