पुणे - नागपूर येथील एका विवाहित महिलेला पुण्यात आणून फसवणूक (Nagpur woman cheated in Pune) केल्याची घटना घडली आहे. एका ३६ वर्षीय महिलेला तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून देण्याचे आणि त्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आहे.
ही विवाहित महिला नागपूरची असून ती विवाहित आहे. नवऱ्यासोबत सतत होणाऱ्या भांडणाला ती कंटाळली होती. त्यामुळे दुसरे लग्न करावे या उद्देशाने तिने एका मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरती नाव नोंदणी केली होती. याच वेबसाईटवर त्या महिलेची समीर बेगमपुरे या युवकाशी ओळख झाली. या महिलेच्या तक्रारीनुसार तिने समीरला आपली पूर्ण कहाणी सांगितल्यानंतर त्याने तिला पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले.
ती महिला जुलै २०२१ मध्ये पुण्यात आली होती. पुण्यात आल्यानंतर ते दोघे कात्रजमधील एका हॉटेलवर एकत्र राहिले. त्याचठिकाणी आरोपीने या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला नागपूरला परत पाठवताना तिच्या पर्समधले १०८ ग्रॅम वजनाचे ३ लाख २५ हजार किमतीचे दागिने काढून घेतले.
दरम्यान, ती महिला नागपूरला परत गेल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. मात्र, नवऱ्याच्या भीतीने तिने घडलेला कुठलाच प्रकार नवऱ्याला सांगितला नाही, परंतु काही दिवसांनी दागिने नसल्याचे नवऱ्याच्या लक्षात आले आणि त्याने महिलेला विचारले. महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघेही पुण्यात आले आणि भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी समीर बेगमपुरे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करत आहेत.