पुणे-कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीही कोरोना रुग्णावर अंतिमसंस्कार करण्यासाठी घाबरतात. अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीदेखील कोणी समोर येत नसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील मुस्लीम तरुणांची उम्मत ही संस्था मागील वर्षभरापासून कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य पार पाडत आहेत. विशेष म्हणजे रमजाननिमित्त उपवास सुरू असतनाही त्यांचे हे कार्य रोज सुरू आहे.
जावेद खान हे उम्मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. तेव्हा ससून रुग्णालयातील आणि रस्त्यावर पडलेल्या बेघर, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यासाठी पोलीस प्रशासन आणि ससून रुग्णालयाची परवानगी घेऊन हे मृतदेह ताब्यात घेतले जायचे. त्यानंतर या मृतदेहाची पाहणी करून त्या धर्मानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जायचे. परंतु मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मे, जूनपासून मृत्यूचे प्रमाण वाढले होते. तेव्हा कोरोनाबधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत उम्मत संस्थेने महानगरपालिकेची परवानगी घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून संस्थेने आतापर्यंत हजाराहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
रमजान महिन्यात उपवास असतानाही काम सुरू-
जावेद खान म्हणाले की, संस्थेचे 30 ते 40 सदस्य दररोज 16 ते 18 तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. संस्थेतील सर्व सदस्य मुस्लिम आहेत. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे बहुतांश सदस्यांचा रोजा असतो. सकाळी सेहरा (न्याहरी) केल्यानंतर हे सर्व घराबाहेर पडतात. सकाळी 10 नंतर रुग्णालय आणि मृतांच्या नातेवाइकांकडून फोन येण्यास सुरुवात होते. मग तिथून पुढे संस्थेच्या कामाला सुरुवात होते. रुग्णवाहिका बुक करणे, रुग्णालयात जाऊन मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवणे, रुग्णवाहिका स्मशानभूमीत पोहोचवणे, त्यानंतर मृतदेहावर धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे काम हे संस्थेचे सदस्य करत आहेत. या संस्थेतील सदस्य हिंदू स्मशानभूमीत चिताही रचतात अन् शेवटचा भडाग्नी देऊन हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार ही पूर्ण करतात.