पुणे - शहरातील कोथरूड परिसरात एका अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुलाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून होता बेपत्ता-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत वंजारी (वय 11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. केळेवाडी परिसरात तो राहत होता. मागील दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस या मुलाचा शोध घेत असताना आज दुपारच्या सुमारास पौड रस्त्याशेजारी असणाऱ्या एका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.