बारामती -म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण सध्या बारामतीसह राज्यभरात आढळून येत आहेत. या आजाराच्या उपचारांसाठी लागणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे या आजारांवरचे औषधोपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) येथे घेतलेल्या कोरोना आढावा संदर्भात बैठकीत दिली.
ऑक्सिजनमधील पाणी वेळेवर बदलावे -
हा आजार होण्यामागच्या कारणासंदर्भात महाराष्ट्र टास्कफॉर्सने असे सांगितले आहे की, ऑक्सिजनमध्ये वापरले जाणारे पाणी वेळेवर बदलणे आवश्यक आहे. यासह अन्य कारणे त्यांनी यावेळी सांगितली.
म्हणून १८ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण थांबविले -
देशाला जेवढी लस हवी आहे. त्या प्रमाणात लस मिळत नसल्याने ठिकठिकाणची लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. सीरम कंपनीकडून लसीचे उत्पादन सुरू असून, भारत बायोटेकसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकदम लसींची मागणी वाढल्यामुळे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठीच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबविले. अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी लसीकरण -
लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात ज्या ठिकाणी गरजेचे आहे. त्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. पुरेशी लस उपलब्ध झाल्यानंतर राज्य सरकारने लसीकरणासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्यानुसार १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू होईल. अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
हेही वाचा - ऑक्सिजन मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर टाकली मांड; इंदूरच्या वृद्धाचा अजब जुगाड