पुणे - नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्यातील सर्व अभ्यासिका बंद आहेत. देशात आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आता अनलॉकच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने आता सर्व अभ्यासिका सुरू कराव्या, अशी मागणी 'एमपीएससी स्टुडंट राईट्स'च्यावतीने करण्यात आली आहे.
सध्या अनलॉकमध्ये हळूहळू सर्व यंत्रणा सुरू करण्यात येत आहेत. निदान आतातरी शासनाने अभ्यासिका सुरू करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या हातात अभ्यासासाठी खूप कमी कालावधी उरलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. त्यांचे अभ्यासाचे सर्व साहित्य पुण्यात अडकले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांसमोर अभ्यास कसा करायचा हा प्रश्न उभा राहिला आहे. हे विद्यार्थी गेल्या दोन ते तीन वर्षापासून या परीक्षेची तयारी करत आहे. आता यांच्यासमोर अवधी खूप कमी असल्यामुळे शासनाने अभ्यासिका सुरू करण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, विशेष नियमावली तयार करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्सचे अध्यक्ष महेश बडे यांनी केली आहे.