पुणे- गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद होते, मात्र मनभेद नव्हता. आता उमेदवारी घोषित झाल्याने आमचे मनोमिलन झाले आहे. बापट यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद नाहीत. इच्छुक अनेकजण असतात, मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वांनी पक्षाचे काम करायचे असते. हा प्रोटोकॉल असतो. त्यामुळे मी पुण्यासह बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे खासदार संजय काकडे म्हणाले. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे एक लाख मताधिक्याने पराभूत होतील, असा दावाही काकडे यांनी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व बारामतीसह सर्व दहा जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला निश्चितपणे हादरा बसेल अशी परिस्थिती सध्या आहे. महायुतीच्या कोल्हापूर येथील सभेला सुमारे ४ लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता. तर, आघाडीच्या सभेला अल्पसा प्रतिसाद होता. पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा मैदानावर व्हायच्या. शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे झालेली प्रचाराच्या शुभारंभाची सभा एका चौकात घ्यावी लागली. यावरुनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जनाधार संपला असून भाजप-शिवसेना महायुतीला मोठा जनाधार प्राप्त झाल्याचे दिसून येते. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळे आमची ताकद आणखी वाढत आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत महायुतीचे चित्र आणखी चांगले झालेले दिसेल आणि यातूनच विजयाची खात्री येते असे काकडे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. बारामती वगळता इतर खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदार संघातून भाजपला आघाडी मिळेल व किमान एक लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल, असेही खासदार काकडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आतापर्यंत महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीवेळी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडली आहे आणि त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. त्यामुळे पुणे लोकसभेतही मी प्रचार करणार आहे. भाजपचे उमेदवार गिरीश बापट बुधवारी भेटीसाठी आले होते. प्रचारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून प्रचारात मी असणार आहे, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.