पुणे -राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवर एका महिलेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचा असल्याचा दावा चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला रडत असल्याचे दिसत असून रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागत आहे.
12सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संबंधित महिला रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना करत आहे. 'मी पूजा, रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला इथे धोका आहे. प्लीज मॅडम मला इथून घेऊन चला, मी विनंती करते', असे व्हिडिओमधील महिला म्हणताना दिसत आहे. याविषयी अधिक माहिती देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, आज सकाळी माझ्या व्हाट्सअप नंबरवर हा व्हिडीओ आला. त्यानंतर संबंधित महिलेने मला फोन करून तडस कुटुंबीयांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानंतर मी संबंधित पोलीस आणि माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना त्या महिलेला संरक्षण देण्यासाठी सांगितले आहे.