पुणे- शहरात कोरोनाचे संकट गेले दोन महिने झाले सुरू आहे. पण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील लोकप्रतिनिधींची एकही बैठक घेतली नाही. लोकप्रतिनिधी फिल्डवर फिरत आहेत. त्यांना फिल्डवर असल्याने अनेक अडचणी माहीत असतात. आमचे सरकारला, प्रशासनाला सहकार्य आहे. त्यामुळे मी पालकमंत्र्यांना पत्र पाठवून बैठक घेण्याची विनंती केल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी यावेळी दिली.
सध्या राज्यात उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. या मागणीसाठी आज पुणे जिल्हा आणि शहर भाजपच्यावतीने खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहरातील परिस्थितीबाबतही लोकप्रतिनिधींनी आयुक्तांशी चर्चा केली. शहरातील रेड झोनमधील नागरिकांसाठी जीवनावश्यक सुविधा महापालिकेने वाढवणे गरजेच आहे. त्यासाठी राज्य सरकारकडेही पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे बापट यांनी सांगितले. सध्या शहरात महापालिका प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय ठेवून नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ससूनची परिस्थिती गंभीर आहे. ती आटोक्यात आणण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. त्यामानाने नायडू रुग्णालयाची स्थिती जरा बरी असल्याचे ते म्हणाले.