पुणे -तपास यंत्रणांचा वापर दमनशाहीसाठी तर होत नाही ना? अशी शंका वारंवार आता उपस्थित होऊ लागली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित काम करत असतांना सरकार अडचणीत आणण्यासाठी आणि आकसापोटी ही कारवाई केली जात आहे आणि ते लोकशाहीला घातक आहे, अशी टीकाही अमोल कोल्हे यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. या पद्धतीने संशय निर्माण करणे आणि दबाव निर्माण करणे सुरू आहे हे लोकशाही साठी चिंतेचा विषय बनला असल्याचे कोल्हे म्हणाले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाला दिली भेट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केलेल्या शिवाजी महाराजांवरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी खासदार अमोल कोल्हे पुण्यात आले होते. या अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. तसेच या अभ्यासक्रमाबाबत चर्चा केली. विद्यापीठ शिवाजी महाराजाच्या नितीवर अभ्यासक्रम सुरू करत आहे, हे स्तुत्य पाऊल असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच आपण हा अभ्यासक्रम जाणून घेतला आणि त्याला स्वतः प्रवेश घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने आजच्या तरुणांईला महाराजांबाबत अधिकाधिक जाणून घेता येईल, मलाही महाराजांचे अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य आणि इतर सर्व बाबी आणखी जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेईल, असे कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे हे विद्यापीठातील भेटीनंतर पुण्यातल्या विधानभवन येथे आले होते. विधानभवन येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीला ते उपस्थित होते.
हेही वाचा -भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे