पुणे -कोरोना काळात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच द्यावे, रात्रपाळीची सिलिंग मर्यादा रुपये 43 हजार 600चा आदेश रद्द करावा, एक जुलै 2017चा रिकव्हरी आदेश पुन्हा काढावा, रेल्वेचे खासगीकरण व कंत्राटीकरण करू नये, अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात स्टेशन मास्तरांच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या सात ऑक्टोबरपासून देशभरातील स्टेशन मास्तर या मागण्या करत आहेत. पहिल्या टप्प्यात ऑल इंडिया स्टेशनमास्तर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून आपल्या मागण्या कळवल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात 15 ऑक्टोबरला स्टेशन मास्तरांनी आपल्या मागण्यांसाठी मेणबत्ती पेटवून सरकारचा निषेध केला होता. तर तिसऱ्या टप्प्यात 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान गणवेशावर काळी फीत लावून या स्टेशन मास्तरांनी आंदोलन केले होते. तर चैथ्या टप्प्यात एका दिवसाचे उपोषण करण्यात आले, मात्र तरीदेखील अद्याप त्यांच्या मागण्याची दखल घेण्यात आलेली नाही.