पुणे - पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाचे 17 हजार सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे वाढत्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरुन काम करावे लागत आहे. त्यामुळे पोलीस दलातही कोरोना पसरला असून शहर पोलीस दलातील तब्बल 1 हजार 156 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील 950 कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 6 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात पोलिसांनी सुरुवातीपासूनच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे प्राण पणाला लावून काम केले आहे. टाळेबंदीच्या काळाील नाकाबंदी, जनजागृती, सामाजिक प्रबोधन, गणेशोत्सव तयारी, बेशिस्तांवरील कारवाईला गती दिली होती. हे कर्तव्य बजावत असतानाच विविध भागात कर्तव्यावर असणाऱ्या अनेकांचा कोरोना बाधितांशी संपर्क आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. मागील सहा महिन्यात विविध पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या तब्बल 1 हजार 150 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोरोनाची बाधा झालेल्या पोलिसांवर तातडीने उपचार व्हावे यासाठी लवळे परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत 950 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. तर 200 कर्मचाऱ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत शहर पोलीस दलातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या या कठीण काळातही स्वतःच्या कौटुंबिक जबाबदारी बाजूला ठेऊन जनतेच्या सेवेसाठी प्राधान्य देणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे शहर पोलीस दलात आतापर्यंत 1 हजार 156 कर्मचारी कोरोनाग्रस्त, 950 जणांनी केली मात - पुणे पोलीस कोरोना बातमी
पुण्यातील आतापर्यंत 1 हजार 156 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 950 जणांनी कोरोनावर मात केली तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 200 सक्रिय पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचास सुरू आहेत.
पुणे पोलीस