पुणे- खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी वारजेतील म्हाडा कॉलनी परिसरात गेलेल्या गुन्हे शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर 125 ते 150 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोघा कर्मचार्यांसह एक खासगी व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली आहे. वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस शिपाई श्रीकांत अरुण दगडे (वय 33 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 125 ते 150 जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत दगडे हे गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकात काम करतात. श्रीकांत आणि ऋषिकेश कोळप हे पोलीस कर्मचारी वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी वारजेतील म्हाडा कॉलनी परिसरातील अभिजित खंडागळेकडे गावठी पिस्तुल आणि काडतुसे असून याच्या सहायाने तो आपल्या साथीदारांसह जबरी चोरी करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. श्रीकांत दगडे यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तपासासाठी हे दोघे मंगळवारी (दि.22 जून) सायंकाळच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात गेले होते.
दरम्यान, अभिजित खंडागळे राहत असलेल्या चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी हे पोलीस कर्मचारी निघाले असताना इमारतीखाली असणारे काही तरुण त्यांच्याकडे संशयाने पाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच पोलिसांसोबत असणारा व्यक्ती धीरज डोलारे हा पोलिसांना कायम चुकीची माहिती देऊन म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याचा समज या तरुणाचा झाला आणि याच रागातून त्यांनी धीरज डोलारे याला सिमेंट ब्लॉक, बांबू आणि लाकडी स्टम्पने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत आम्ही पोलीस आहोत, तुम्ही सरकारी कामात अडथळा आणू नका, असे सांगितले. तरीही आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या गर्दीतून कशीबशी वाट काढत तक्रारदाराला घेऊन माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले.