मुंबई- मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The Third Wave of Corona Virus ) आटोक्यात आल्यानंतर ५० च्या आत रुग्णसंख्या नोंदवली जात होती. गेल्या काही दिवसात त्यात वाढ झाली आहे. मे च्या शेवटी ५०० च्या वर रुग्ण आढळून आले जूनमध्ये त्यात वाढ होऊन सलग तीन दिवस ७०० च्या वर रुग्णांची नोंद झाली आहे. आज आणखी वाढ होऊन ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज (दि. ४ जून) एका मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४ हजार २९४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
८८९ नवे रुग्ण -मुंबईत आज (शनिवार) ८८९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६८ हजार ८९७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४५ हजार ३५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार २९४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ३९६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४९ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ८८९ रुग्णांपैकी ८४४ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७१ बेड्स असून त्यापैकी १५४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.