पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना दरोडाविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 42 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात, 26 मोबाईल आणि तीन दुचाकींचा समावेश आहे. सागर मोहन सावळे (वय 22) आणि नीलेश देवानंद भालेराव (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दोघे ही चिखली परिसरात राहतात.
सापळा रचून अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील उड्डाणपुलाखाली आरोपी सागर आणि नीलेश हे दोघे मोबाइलवर बोलत पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पोबारा करत. याविषयी दरोडाविरोधी गुन्हे शाखा यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली.
दिवसाआड प्रेयसीला चोरी करून मोबाइल देत
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सागर आणि नीलेशची प्रेयसी असून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ते मोबाइल चोरी करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दिवसाआड त्यांना ते चोरी केलेला मोबाइल द्यायचे, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, याबाबत त्या प्रेयसीला माहित नव्हते, असे पोलिसांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले आहे.
'या' पथकाने केली ही कारवाई
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, प्रविण माने, राजेश कौशल्य व गणेश कोकणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.