पुणे- कोथरूड मधील कर्वेनगर चौकातील कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलाला सुशोभीकरणच्या नावाखाली हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आले आहेत. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेने कामकाजात अधिकृतपणे हिंदी भाषा वापरण्याचा एखादा नवा कायदा केला आहे का.? की हळू हळू हिंदी भाषा किंवा इतर कोणतीही परप्रांतीय भाषा पुणेकरांच्या माथी मारून ती मनावर बिंबवण्याचा काही कावा सत्ताधाऱ्यांनी आखला आहे? असा सवाल केला. तसेच मनपाच्या या कृतीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या उड्डाणपुलावर हिंदीत लहिलेल्या संदेशाला काळे फासण्यात आले.
महाराष्ट्रात फक्त मराठीच-
पुणे शहरात भिंती सुशोभीकरणाचे काम सध्या शहरातील विविध भागात सुरू आहे. सुशोभीकरणाच्या देण्यात येणाऱ्या संदेश हे हिंदीत दिले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात हिंदी भाषेचा अतिरेक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीही सहन करणार नाही. पुणेकरांवर जबरदस्तीने लादलेल्या हिंदी भाषेचा आम्ही जाहीर विरोध आणि निषेधही करतो. "महाराष्ट्रात आणि त्यात पुण्यात तर फक्त मराठीच" हा मराठी भाषेच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. यामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने मनसे खंबीरपणे मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या बाजूनेच उभी असेल, असा संदेशच मनसेने प्रशासनास दिला.