पुणे- रुग्णालयाचे बिल कमी करण्याच्या वादातून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी रुबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे नगरसेवकाची रुबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकाला मारहाण, बिल कमी करण्यावरून झाला वाद - Ruby Hall clinic manager news
रुग्णालयाचे बिल कमी करण्याच्या वादातून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी रुबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू होते. सोमवारी पुण्यातील मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर या रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान त्यांनी बिल कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. दरम्यान व्यवस्थापक आणि बाबर यांच्यात बिल कमी करण्यावरून वादावादी झाली. यातूनच साईनाथ बाबर यांनी सदर व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आणि त्याला दमदाटी केली.
दरम्यान हे प्रकरण वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि या दोघांनीही परस्परविरोधी तक्रार दिली. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. साईनाथ बाबर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.