पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले आहेत. राज्यभर आंदोलन करत आहेत.अश्यातच शिवसेनेकडून (Shiv Sena) मेळाव्याचे आयोजन करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टिका केली जात आहे. ज्या लोकांनी बंड केल आहे, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आजाराचा फायदा घेतला आहे. उद्या फलोर टेस्टमध्ये काय होईल ते होईल, पण जेव्हा या आमदारांचा रोड टेस्ट होईल तेव्हा त्यांचा सामना शिवसैनिकांशी होईल असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते सचिन आहीर यांनी दिला आहे.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Constituency) शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे उपस्थित होते.