पुणे- मैत्रिणीकडे खेळण्यासाठी निघालेल्या एका 7 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्या एका 40 वर्षीय विकृताला जमावाने चांगलाच चोप दिला आहे. पुण्याच्या नवी पेठेतील एका इमारतीच्या पार्कींगमध्ये हा प्रकार घडला. महेश पंढरीनाथ शिंदे असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -बालकांवरील लैंगिक अत्याचार जनजागृतीसाठी चित्रफीत; अमरावती ग्रामीण पोलिसांचा 'मॉडेल प्रोजेक्ट'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सात वर्षाची मुलगी मैत्रिणीकडे खेळण्यासाठी निघाली होती. आरोपीने तिला आपल्या जवळ बोलावून घेत एका इमारतीच्या पार्किंगमध्ये नेले आणि तेथे तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. दरम्यान, इमारतीतील काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी धाव घेत नराधमाला चोप दिला.
हेही वाचा -अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 10 वर्षांचा कारावास
जमलेल्या पैकी एका नागरिकाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने विश्रामबाग पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या महेश शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गीता पाटील करीत आहेत.