पुणे -ओबीसी समाजाला आरक्षणाचा (OBC Reservation) मजबूत आधार होता. मी जेव्हा एमपीएससी, यूपीएससीला बसलो तेव्हा समाजाला कुठलेही आरक्षण नव्हते. माझ्या घरातील कोणीही आरक्षणाचा फायदा घेतला नाही. माझ्या मतदारसंघात ओबीसी समाजाची 15 घरे देखील नाहीत, पण समाजासाठी बोलायचे नाही हे माझ्यासाठी कधीच शक्य नाही. मी कशावरही माझा स्टॅम्प लावून घेतला नाही, असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) म्हणाले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मुसलमानांची दलाली करतो असे मला कधी सांगितले जाते, तर कोणी मला ख्रिश्चनचे दलाल म्हणतात. आता तर ख्रिश्चनबद्दल जास्तच बोलायला लागलो आहे असे सांगितले जात आहे कारण जावईच ख्रिश्चन आहे. पण मी बोलतो कारण तुम्हाला कळले पाहिजे की नकळत जेव्हा आपण दुसऱ्याचे हिरावून घेतो तेव्हा आपलं हिरवलं जातं, असे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पुण्यात वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. यावेळी एमपीएससी, यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जर 50 टक्के समाज एकत्र आला तर...
ओबीसी समाजाला पॉलिटिकली आरक्षण का महत्त्वाचे आहे तर ज्या घडामोडी तुमच्या सामाजिक हितासाठी असतात, परिवर्तनाच्या प्रभावात तुम्हाला घेऊन जाण्यासाठी असतात. बदल घडवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. ती निर्णय प्रक्रिया आता तुमच्या हातातून काढून टाकली आहे. जो समाज प्रगतीच्या वाटा शोधत बाहेर पडला होता त्यासाठी आता पुन्हा दार बंद करण्यात आले आहे. हा समाज जर 50 टक्के एकत्र आला तर या देशात स्वातंत्र्यानंतरची मोठी क्रांती घडू शकते, असे देखील यावेळी आव्हाड म्हणाले.
सत्य लपवण्याचे काम काहीजण करत असतात
आव्हाड म्हणाले, मी कायमच बहुजनांची वाचा बोलत आलो आहे. काही वर्षांपूर्वी राज्यात एक वर्ष गदारोळ सुरू होता. दिवंगत पुरंदरे यांच्या शिवचरित्रावरून. माझी भूमिका घेऊन मी आणि माझे 4 सवंगड्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. इतिहास आणि संदर्भ जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत सत्य हे कळत नाही. सत्य लपवण्याचे काम हे काहीजण करत असतात. त्याकडे आपण बघितलं पाहिजे. तसेच आताही मी जे काही ओबीसी समाजावरून बोललो त्यात मलाच कळले नाही की एवढा गदारोळ कशावरून झाला. मी जे काही बोललो त्यावर मी आजही ठाम आहे.