पुणे -अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणे किंवा त्यांनी राजीनामा देणे हे बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil On Nawab Malik Resignation ) यांनी दिली. पुण्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राजीनामा घेता मग राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून का नाही, असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक होणार याचा अंदाज आल्यामुळे त्यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. पण, केंद्रीय तपाय यंत्रणा तसेच ईडीकडून विविध आरोप देशमुख यांच्यावर होत आहेत. जाणून बुझून आमच्या सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका मंत्र्यांनी राजीनामा दिला तर दुसऱ्यांकडून घेऊ असे होणार नाही, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.