पुणे - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्या टीकेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे. हे विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेलं आहे ज्याची डिपॉझिट कोणी ठेवत नाही त्याची तुम्ही काय एवढी दखल घेता. प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊन पट्ट्याचे डिपॉझिट जप्त होत आहे आणि तुम्ही पत्रकार परिषदेत मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारत आहात, लोकांनीच त्याला नाकारलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला फार महत्त्व द्यायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्याची सन 2021 22 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याला काहीच अर्थ नाही
पुण्यातील हडपसर येथे पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणी चौकशी सुरू आहे, पण चौकशी होण्याआधीच काही लोक आरोप करत आहेत, याला काहीच अर्थ नाही. चौकशी झाल्यानंतर याचा अहवाल समोर येईल असं मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं.