पुणे -गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी पायी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राज्यातील काही शहरांमध्ये कोरोना वाढू लागला असून पुन्हा आषाढी वारीवर कोरोनाचा संकट दिसून येत आहे. या दोन वर्षात सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मी पांडुरंगाला विनंती करतो, यंदाचा वारीचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी पांडुरंगाला घातला आहे. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ ( Alandi Palkhi Ceremony Review Meeting ) पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
'पालखीत लसीकरणची सुविधा करण्यात यावी' :पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्ग, पालखी तळ आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या भाविकांनी कोरोना लशीची दुसरी मात्रा किंवा वर्धक मात्रा घेतली नसेल त्यांना ती घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे, यासाठी लसीकरणाची सुविधा करण्यात यावी, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
'पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न' :पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
'आषाढी वारी ॲपचे उद्घाटन' :बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.