पुणे -माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडण्यासाठी सतत दिरंगाई होत आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील ( Mathadi Worker Leader Narendra Patil ) यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात ( Mathadi Worker Agitation Pune ) आला. यावेळी मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते.
पुणे येथे माथाडी कामगारांसाठी टोळी पद्धत लागू केली आहे. त्यानुसार मार्केटमधील पालावाला महिला कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळणे. तसेच मार्केटमध्ये अनोंदीत/डमी कामगारांवर कारवाई करणे, असे माथाडी कामगांराचे प्रश्न प्रलंबित आहेत. या कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अप्पर कामगार आयुक्त, माथाडी बोर्डाचे अधिकारी सातत्याने दिरंगाई करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ही मागण्या मान्य केल्या नाहीतर तीव्र आंदोलन करु, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.