पुणे-मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात स्थगितीच्या निर्णयानंतर मराठा समाजाकडून विविध मार्गाने निषेध व्यक्त केला जातो आहे. पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन राज्य सरकाराने कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी, मराठा समाजाची फसवणूक केली जात असून आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने मागण्या मान्य कराव्या नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा राजेंद्र कोंढरे यांनी दिला.मराठा क्रांती मोर्च्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता.
मराठा क्रांती मोर्चा, पुणे यांच्यावतीने मागण्यांबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मराठा समाजातील एक लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. मात्र, स्थगिती दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अधांतरी झाले आहे. त्यांचे प्रवेश संरक्षित करावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा कडून यावेळी करण्यात आली.
आरक्षणाला स्थगिती आली असताना देखील राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर करून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका मराठा क्रांती मोर्चा कडून करण्यात आली आहे. मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली.