पुणे - राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. एकीकडे राज्य सरकार मराठा आरक्षण प्रकरणी केंद्राकडे बोट दाखवत आहे. तर केंद्र आमचा काही संबंध नाही, आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगत हात झटकत आहे. याच पार्श्वभूमीवर 20 ऑगस्टला अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चा यांची पत्रकार परिषद आज(9 ऑगस्ट) पुण्यात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला राज्यातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा -Maratha Reservation : अशोकराव चव्हाण यांची मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करा - विनायक मेटे
- 20 ऑगस्टला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन -
या बैठकीत मराठा आरक्षण मिळण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल याची चर्चा झाली .या बैठकीनंतर मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका मांडली. राज्यसेवा आयोगाची परिक्षा देऊन मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यांच्या नियुक्त्या अजूनही रखडल्या आहेत. मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळाले नाही. त्याच कारणावरून 20 ऑगस्ट रोजी राज्य सरकारमधील मंत्री असलेले अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन खेडकर यांनी दिली.
- ...तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही -
मराठा आरक्षण मुद्द्यावर आता खेळ नको. आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल घेतली नाही तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही, असा सज्जड दम मराठा क्रांती मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. जे आमदार, खासदार मराठा समाजाला मदत करत नाहीत हेटाळणी करतात, त्यांना यापुढे विचार करावा लागेल, असा इशाराही पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला.
हेही वाचा -Maratha Reservation: अशोक चव्हाण मराठा समाजाचा घात करत आहे - मराठा क्रांती मोर्चा