पुणे-अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत असलेल्या क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात किरण गोसावी हा पंच होता. या किरण गोसावीने विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर किरण गोसावीने त्याच्यासोबत सेल्फी काढला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, गोसावीशी संबंध नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.
किरण गोसावी याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत चिन्मय देशमुख (वय २२) या तरुणाने २०१८ मध्ये पोलुसांकडे तक्रार दिलेली आहे. याप्रकरणी गोसावीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारणाबाबत तक्रारदार चिन्मय देशमुख यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली आहे. चिन्मय देशमुख या तरुणाने सांगितले, की 2018 ला किरण गोसावी हा फेसबुकच्या संपर्कात आला. त्याने मलेशियात नोकरी लावण्यासाठी 3 लाखांची मागणी केली. त्यासाठी मुंबईत भेटायला बोलाविले. मात्र, त्याने फसवणूक केली. अशाच प्रकारे अनेकजणांची फसवणूक केली आहे. कदाचित तो आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवित असावा. त्याची चौकशी करावी, जेणेकरून भविष्यात फसवणूक होणार नाही.
हेही वाचा-Aryan Khan Drug Case LIVE - माझ्याकडे दुसरी प्रकरणं देखील आहेत, वेळेत बाजू मांडा - न्यायमूर्ती
काय आहे नेमके प्रकरण?
2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत आहेत. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.
हेही वाचा-समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा