पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील 'बर्गर किंग'च्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये साजिद खान या तरुणाच्या गळ्याला जखम झाली आहे. ही घटना १५ मे रोजी घडली असून डेक्कन पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यात बर्गरमध्ये आढळले काचेचे तुकडे, ग्राहक थेट आयसीयूत - बर्गर किंग
पुण्यात 'बर्गर किंग'च्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
साजिद खान हा बुधवारी मित्रांसोबत बर्गर खाण्यासाठी फर्ग्युसन रस्त्यावरील 'बर्गर किंग'मध्ये गेले होते. बर्गर खात असताना त्यांच्या घशाला त्रास झाला. काही वेळाने त्यांच्या घशामधून रक्त यायला लागले. मित्रांना बर्गरविषयी शंका आल्याने त्यांनी बर्गरची तपासणी केली असता त्यांना त्यात काचेचा तुकडा आढळून आला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.
घटनेनंतर साजिद खान यांनी डेक्कन पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनीही 'बर्गर किंग' या हॉटेलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बर्गर किंग हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.