पुणे -अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी उत्तर दिले आहे. ही एक नवीन पद्धत काढण्यात आली आहे. एक तर खोटे नाटे आरोप करायचे आणि त्यानंतर केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. या गोष्टींनी सरकारची प्रतिमा बिघडणार नाहीय आम्ही पारदर्शी पद्धतीने काम करत आहोत, असे मत वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, 'एक तर खोटे-नाटे आरोप करायचे आणि त्यानंतर केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. जो संबंध नाही तो संबंध जोडायचा. त्यातून सरकार विरोधात वातावरण बदल करायचे. एकाबाजूला कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे, असे सांगायचे. दुसऱ्या बाजूला लहान लहान गोष्टींवर मोर्चे काढून कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करायची. पण, या गोष्टींनी सरकारची प्रतिमा बिघडणार नाही. आम्ही पारदर्शी पद्धतीने काम करत आहो. भविष्य काळात देखील करत राहणार आहे.'
किरीट सोमैयांच्या दापोली दौऱ्याबाबत बोलताना वळसे-पाटील यांनी ( Dilip Walse Patil On Kirit Somaiya ) सांगितले की, 'किरीट सोमैयांना एवढे महत्त्व देण्याचे कारण नाही. ते कुठे गेलेत, आता कुठे पोहोचलते, याची माहिती मी ठेवत नाही. कोणालाही कुठलीही लढाई लढाईची असेल तर ती कायदेशीर पद्धतीने लढली पाहिजे. कोणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही. कुणीही चुकीच्या पद्धतीने कायदा हातात घेत असेल, तर पोलीस नियमांप्रमाणे कारवाई करतील.'