पुणे - राज्यात कोरोनाची परिस्थिती भीषण होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आतातरी खोट बोल पण रेटून बोल हे थांबवायला हवे. त्यांनी केंद्रातून राज्यासाठी जास्तीत जास्त मदत कशी आणता येईल याचा विचार करावा, असे सांगत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
नाना पटोले यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर रेमडेसिवीर असे सर्व साहित्य केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. परंतु राज्यांना याचा सुरळीत पुरवठा होत नाही. मात्र अशा परिस्थितीतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलत आहेत. त्यांनी या ऐवजी केंद्र सरकारकडे राज्यासाठी मदत मागायला हवी.
कोरोनाला महामारी म्हणून घोषित करावे
भारतातील परिस्थिती पाहता अनेक देश मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. हे देश राज्याला मदत करू इच्छितात. आता तरी केंद्र सरकारने कोरोनाला महामारी म्हणून घोषित करावे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली.